चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय प्राप्त केला आहे. भारतीय संघाने तब्बल 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला असून या सामन्यात शुभमन गिल, ऋषभ पंतसह रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी करत छाप पाडली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे.
चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा 280 धावांनी धुव्वा उडवला आहे. भारताने बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ 234 धावांतच गडगडला.या सामान्यांमध्ये भारतासाठी रविचंद्रन अश्विनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेऊन बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडवली आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या डावात ऋषभ पंत, शुभमन गिलची छाप..
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 124 चेंडूत ऋषभ पंतने आपले शतक पूर्ण करून 109 धावा करत तो बाद झाला. ऋषभ पंतने शतक झळकवल्यानंतर त्याच्यासह संपूर्ण मैदान भावूक झाल्याचं दिसून आले. मैदानात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि ड्रेसिंग रुममधील सर्व खेळाडूंनी उभे राहत ऋषभ पंतचे यावेळी कौतुक केले. ऋषभ पंतने या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार लागावले. ऋषभ पंत शतक झळकवून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने सुद्धा आपले शतक पूर्ण केले.