IND A vs AUS A : यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल याने सलग दुसरे अर्धशतक झळकावून भारतीय कसोटी संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी पक्की केली आहे. पण, त्याच्या अप्रतिम प्रयत्नानंतरही दुसऱ्या आणि अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारत अ संघाला ऑस्ट्रेलिया अ संघाकडून पराभव पत्करावा लागला. शनिवारी येथे झालेल्या अनधिकृत कसोटी सामन्यात सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. अशा प्रकारे भारत अ संघाने दोन सामन्यांची मालिका 0-2 अशी गमावली.
भारतीय संघाने सकाळी पाच विकेट्सवर ७३ धावांनी आपला डाव पुढे सरु केला. पहिल्या डावात 80 धावा करणाऱ्या जुरेलने दुसऱ्या डावात 122 चेंडूत पाच चौकारांसह 68 धावांची संयमी खेळी केली. ज्युरेलने बाद होण्यापूर्वी नितीश कुमार रेड्डी (38) सोबत 94 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. प्रसिध कृष्णा (29) आणि तनुष कोटियन (44) यांनीही चांगली खेळी खेळत भारताला दुसऱ्या डावात 229 धावांपर्यंत नेले आणि यजमान संघासमोर 168 धावांचे लक्ष्य उभे केले.
भारत अ संघाच्या दुसऱ्या डावात ऑफस्पिनर कोरी रोसिओलीने ऑस्ट्रेलिया अ संघासाठी ७४ धावांत चार बळी मिळवले. त्याला अष्टपैलू ब्यू वेबस्टर (४९ धावांत तीन बळी) आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नॅथन मॅकअँड्र्यू (५३ धावांत दोन विकेट) यांचीही चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलिया अ संघाकडे मोठे लक्ष्य नव्हते पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने (३७ धावांत २ बळी) मार्कस हॅरिस आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना डावाच्या पहिल्याच षटकात लागोपाठ चेंडूवर बाद करून भारताच्या अशा पल्लवित केल्या. या सामन्यात सहा विकेट्स घेत त्याने बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारतीय अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्याचा दावाही केला.
यानंतर मुकेश कुमारने कर्णधार नॅथन मॅकस्विनी (25) याला विकेटच्या मागे झेलबाद केले आणि ऑस्ट्रेलिया अ संघाची धावसंख्या तीन विकेट्सवर 48 धावांवर आणली. परंतु, सॅम कॉन्टास एका टोकाला ठाम होता. त्याने 128 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याचा दावेदार असलेल्या या युवा फलंदाजाने वेबस्टरसोबत (६६ चेंडूत नाबाद ४६ धावा) ९६ धावांची अखंड भागीदारी करून संघाला लक्ष्यापर्यंत नेले.