केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय नोंदवला. यासह टीम इंडियाने केपटाऊनच्या मैदानावर 30 वर्षांनंतर इतिहास रचला. 30 वर्षांनंतर भारतीय संघाने केपटाऊनच्या मैदानावर कसोटीत पहिला विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताने मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य होते, जे संघाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सहज गाठले.
भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 2 दिवसांत पराभव केला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. नाणेफेक जिंकल्यानंतर डीन एल्गरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने अवघ्या 15 धावांत 6 विकेट घेतल्याने संपूर्ण संघ 55 धावांपर्यंतच मर्यादित राहिला. पहिल्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांची कामगिरीही चांगली नव्हती. संपूर्ण संघ मिळून केवळ 153 धावा करू शकला. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला खाते उघडता आले नाही.
दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या 6 विकेट घेत संघाच्या मोठ्या धावसंख्येच्या आशा संपुष्टात आणल्या. एका टोकाला अनुभवी सलामीवीर एडन मार्करामने खंबीरपणे उभे राहून शानदार शतक झळकावले. या खेळीनंतरही दक्षिण आफ्रिकेला भारतासमोर केवळ 79 धावांचे लक्ष्य देता आले. त्याच्याशिवाय अन्य कोणताही खेळाडू दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी खेळी खेळू शकला नाही. जसप्रीत बुमराहची जादू दुसऱ्या डावात पाहायला मिळाली. बुमराहने दुसऱ्या डावात एकूण 6 विकेट घेतल्या. त्याने ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन, मार्को जेन्सन आणि केशव महाराज यांच्या विकेट घेतल्या. बुमराहशिवाय मुकेश कुमारने टोनी डी जॉर्जी आणि डीन एल्गरला बाद केले.