IND VS NZ मुंबई: टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागेल, असे बंगळुरूमध्ये कोणालाही वाटले नव्हते. पण असे झाले की, न्यूझीलंडने पहिली कसोटी आठ गडी राखून जिंकली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पुढील कसोटी सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्यात सुरु होणार असून तेथे किवी संघावर प्रतिआक्रमण करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर न्यूझीलंडवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पुण्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टी बनवली जाणार आहे. पुण्यात काळ्या मातीची खेळपट्टी तयार केली जाईल, जिथे बाऊन्स खूपच कमी असेल यामुळे फिरकीपटूंना खूप मदत मिळेल. ही खेळपट्टी विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात वापरली गेली होती, अगदी तशीच असेल.
दरम्यान बंगळुरु पराभवानंतर आता टीम इंडियाला मालिका २-१ ने जिंकायची असेल, तर पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या बनवल्या जातील. ESPNcricinfo च्या अहवालानुसार, पुण्याची खेळपट्टी कोरडी आणि कमी उसळी घेणारी असेल. टीम इंडियाही तीन फिरकीपटूंसह पुण्यात दाखल होणार आहे. अलीकडेच टीम इंडियाने वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला आहे, त्यामुळे टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये फिरकीपटू वाढवण्याबरोबरच फलंदाज वाढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांचा समावेश करून हे काम करता येईल. दोघेही चांगले फिरकीपटू आहेत आणि फलंदाजीही करतात.
पुण्यात फिरकीपटूंसाठी योग्य खेळपट्टी असल, तरी येथे नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे ठरेल. फिरकीच्या अनुकूल ट्रॅकवर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला सहसा फायदा होतो. कारण चौथ्या डावात फलंदाजी करणे खूप कठीण असते. आता पुण्यात भारत नाणेफेक हरली, तर न्यूझीलंडचा संघ पलटवार करू शकतो. टीम इंडियाचा पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात ३३३ धावांनी पराभव झाला होता.