गयाना : पावसाचा खेळ बघता बघता, टी ट्वेण्टी वर्ल्ड कप 2024 ची दुसरी सेमी फायनल भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पार पडली. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 7 विकेट गमावून 171 धावा केल्या. यानंतर अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं इंग्लंडला गुढघे टेकवण्यास भाग पाडले.
भारतानं अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची लढत होणार आहे. भारतानं इंग्लंडला 103 धावांवर सर्वबाद करत 68 धावांनी विजय मिळवला. अखेर भारतानं 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत झालेल्या आपल्या पराभवाचा बदला घेतला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी सेमी फायनल गयाना येथे पार पडली. पावसामुळे ही मॅच उशिराने सुरु झाली. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु तो निर्णय चांगलाच अंगलट आला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली. भारतानं 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 171 धावा केल्या. रोहित शर्मा याने नेहमीप्रमाणे आक्रमक पण परिस्थितीशी जुळवून घेत फलंदाजी केली.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. विराट कोहली याने टॉप्लीला उत्तुंग षटकार मारल्यानंतर जोरदार फटका मारण्याच्या नादात 9 धावावर आपली विकेट गमावली. रिषभ पंत केवळ 4 धावाच करुन शकला. यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी महत्त्वाची भागिदारी रचत भारताचा डाव सावरला. रोहित शर्माने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत 57 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने देखील 47 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने ताबोडतोब 23 धावा करत, इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला. शिवम दुबे शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजाने 17 तर अक्षर पटेलने 10 धावा केल्या. इंग्लंडकडून जॉर्डन याने 3 विकेट घेतल्या.
दरम्यान, भारतानं विजयासाठी इंग्लंडपुढे 172 धावांचे आव्हान ठेवले होते. अक्षर पटेलने जोस बटलरच्या रुपात भारताला पहिली विकेट मिळवून दिली. बटलरने 23 धावा केल्या .जसप्रीत बुमराह याने सॉल्टला बाद करत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. इंग्लंडच्या डावाच्या सहाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अक्षर पटेल याने जॉनी बेयरस्टोला शून्यावर बाद करून तिसरा धक्का दिला. अक्षर पटेल याच्या बॉलिंगवर इंग्लंडने आणखी एक विकेट गमावली. मोईन अली रिषभ पंतच्या सतर्कतेने यष्टीचीत झाला.
कुलदीप यादवने सॅम करनची विकेट घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला. हॅरी ब्रुक याने 25 धावा करत इंग्लंडच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकदा जीवदान मिळून देखील तो कुलदीप यादव पुढे टिकू शकला नाही. कुलदीपने ब्रुकचा त्रिफळा उडवला. कुलदीप यादवने ख्रिस जॉर्डनला 1 रनवर बाद करत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. इग्लंडचे दोन खेळाडू धावबाद झाले. जसप्रीत बुमरहानं इंग्लंडची शेवटची विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला.