मुंबई: चेन्नई कसोटीत टीम इंडियाने बांगलादेश संघाचा 280 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. या विजयानंतर आता भारतीय संघ मालिका पूर्णपणे काबीज करण्यासाठी कानपूरला पोहोचला आहे, जिथे दुसरा सामना होणार आहे. 27 सप्टेंबरपासून होणाऱ्या या सामन्यापूर्वी 3 भारतीय खेळाडू नेटमध्ये घाम गाळताना दिसले. संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल सरावासाठी प्रथम आले. या दोघांसोबत सरफराज खानही सरावासाठी आला होता. त्याला सराव करताना पाहून केएल राहुलला कानपूर कसोटीतून वगळले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या जागी सरफराजला संधी मिळणार आहे.
सरफराजला खरंच संधी मिळेल का?
चेन्नई कसोटीत केएल राहुलला चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात त्याने केवळ 16 धावा केल्या होत्या. त्याचवेळी त्याला दुसऱ्या डावात जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. कारण कर्णधार रोहित शर्माने 287 धावांवर डाव घोषित केला होता. त्यामुळे राहुल 19 चेंडूत 22 धावा करून नाबाद परतला. अशा स्थितीत त्याला कानपूर कसोटीतून वगळून सरफराज खानला संधी देण्याची चर्चा आहे. मात्र, असे होणे अवघड आहे, कारण इराणी चषकासाठी उर्वरित भारतीय संघात सरफराजच्या नावाचा समावेश आहे.
सरफराज खान ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली मुंबईविरुद्ध खेळताना दिसणार आहे. मात्र, कानपूर कसोटीसाठी बीसीसीआयने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलेली नाही. टीम इंडियासोबत उपस्थित असलेले खेळाडू कानपूर कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतील तर त्यांना इराणी चषकासाठी जावे लागेल, असे बोर्डाने निश्चितपणे म्हटले आहे. सरफराजसह यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल आणि वेगवान गोलंदाज यश दयाल यांनाही भारताच्या उर्वरित संघात ठेवण्यात आले आहे.
Jaiswal, and Sarfaraz among your top three starting the net practice today.. pic.twitter.com/Vf0FHRAVEf
— Vimal कुमार (@Vimalwa) September 25, 2024
सरफराज खानने या वर्षी इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्माने 5 सामन्यांच्या मालिकेत 3 सामन्यात संधी दिली, ज्यामध्ये तो 3 अर्धशतके झळकावण्यात यशस्वी ठरला. सरफराजने 5 डावात एकूण 200 धावा केल्या होत्या. मात्र, नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने दोन सामने खेळले, ज्यामध्ये त्याला एकूण 71 धावा करता आल्या.