कानपूर: भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर येथील ग्रीन पार्क येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. गेले दोन दिवस पावसामुळे एकही चेंडू टाकला न गेल्याने अखेर सोमवारी सामन्याला सुरुवात झाली. बांगलादेश 233 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताने पहिला डाव 285/9 धावांवर घोषित करत बांगलादेशवर 52 धावांची आघाडी मिळवली. भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशला दोन बाद २६ धावांवर रोखले. बांगलादेशचा संघ सध्या 26 धावांनी पिछाडीवर आहे.
आता भारत आणि बांगलादेश यांच्यात एक दिवसाचा खेळ शिल्लक असून या सामन्याच्या निकालाकडे भारतीय संघाचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसाने वाहून गेल्यानंतर हा सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत होते, मात्र आता हा सामना रोमांचक बनला आहे. पाचव्या दिवशी भारत बांगलादेशचा दुसरा डाव लवकरात लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल, तर पाहुण्या संघ भारताला कोणत्याही किंमतीत क्लीन स्वीपपासून रोखण्याचा प्रयत्न करेल. शदमान इस्लाम सात धावा आणि मोमिनुल हक खाते न उघडता क्रीजवर आहे. भारताकडून अश्विनने दोन्ही विकेट घेतल्या.
दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी 35 षटकांचा खेळ झाला, ज्यामध्ये बांगलादेशने 3 विकेट गमावून 107 धावा केल्या. चौथ्या दिवशी मैदानावर आल्यानंतर लगेचच 11 धावा करून मुशफिकुर रहीम बाद झाला, पण मोमिनुल हक दुसऱ्या बाजूने शेवटपर्यंत क्रीजवर राहिला. त्याने 107 धावांची नाबाद खेळी खेळली आणि आपल्या संघाला 233 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले.
भारताची आक्रमक फलंदाजी
भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी येताच तुफानी फलंदाजीला सुरुवात केली. जैस्वाल आणि रोहितने मिळून केवळ 3 षटकात 51 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा 23 धावा करून बाद झाला, तर दुसरीकडे जैस्वालने अवघ्या 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्याचा डाव 72 धावांवर संपला. सामन्याला फक्त एक दिवस शिल्लक असल्याने सर्व भारतीय फलंदाज फटकेबाजी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. विराट कोहलीने 47 धावांची वेगवान आणि खेळी खेळून भारताला 285 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर केएल राहुलने 68 धावांची आक्रमक खेळी केली. या सामन्याचा दुसरा आणि तिसरा दिवस पावसाने पूर्णपणे वाहून गेल्यानंतर चौथ्या दिवसाच्या खेळात एकूण 18 विकेट पडल्या आणि दिवसभरात एकूण 437 धावा झाल्या.