IND vs AUS Final: अहमदाबाद: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 240 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज डावाच्या सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसत होते. भारताकडून केएल राहुलने ६६ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय विराट कोहलीने 54 धावा केल्या. आता या कमी धावसंख्येचा बचाव करण्यासाठी भारताला कपिल देवच्या संघाने 1983 च्या विश्वचषक फायनलमध्ये 183 धावांचा बचाव करून जे पराक्रम केले होता, तो करावा लागणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला भारतीय संघ सुरुवातीपासूनच डळमळीत दिसत होता. मात्र, कर्णधार रोहित शर्माने 151.61 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 47 धावांची इनिंग खेळून संघाला आवश्यक ती सुरुवात करून दिली. भारताने 10 षटकात 2 विकेट गमावत 80 धावा केल्या होत्या, परंतु यानंतर हळूहळू संघावर दडपण येऊ लागले.
चांगली सुरुवात नाही
अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला चांगली सुरुवात करता आली नाही. भारताने 5 व्या षटकातच शुभमन गिलच्या (04) रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर, रोहित शर्मा याला 10 व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तुफानी शैलीत खेळणारा हिटमॅन 31 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला.
11व्या षटकात 04 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर श्रेयस अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर भारतीय संघ सावरू शकला नाही. अय्यरला पॅट कमिन्सने बाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची (109 चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी पॅट कमिन्सने विराट कोहलीला बाद करत मोडली. कोहली 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला. यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेला रवींद्र जडेजा 36व्या षटकात 09 धावांवर हेझलवूडचा बळी ठरला.
यानंतर चांगल्या खेळीच्या दिशेने वाटचाल करणारा केएल राहुल 42 व्या षटकात 1 चौकाराच्या मदतीने 66 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुलला मिचेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर 44व्या षटकात मोहम्मद शमीला मिचेल स्टार्कने 06 धावांवर बाद केले, 45व्या षटकात अॅडम झाम्पाने जसप्रीत बुमराला 01 धावांवर बाद केलेआणि 48व्या षटकात हेझलवूडने सूर्यकुमार यादवला 18 धावांवर बाद केले. 50व्या षटकात कुलदीप यादव बाद झाला. 10 धावांवर तो धावबाद झाला.
ऑस्ट्रेलियाची भेदक गोलंदाजी (IND vs AUS Final)
ऑस्ट्रेलियाकडून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. मिचेल स्टार्कने ३ बळी घेतले. यादरम्यान त्याने 10 षटकात 55 धावा दिल्या. याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी २ बळी घेतले. तर ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा यांना 1-1 यश मिळाले.