ICC World Cup 2023 Final : मुंबई : टीम इंडिया जरी विजयीपथावर स्वार असली तरी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. ऑसी संघाला कमी समजण्याची चूक टीम इंडिया नक्कीच करणार नाही. विश्वचषक फायनल खेळण्याचे दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टॉप-7 फलंदाजांपैकी टीम इंडिया विरुद्ध चार फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. काही फलंदाज सरासरीमध्ये उत्कृष्ट आहे, तर काही स्ट्राईक रेटच्या बाबतीत आघाडीवर आहेत. ऑसी संघाचे स्टार फलंदाज कधी टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजांचीच विकेट काढतील, याचा नेम कोणालाच लागणार नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांची आज कसोटी लागणार आहे.
ट्रॅव्हिस हेड
ऑस्ट्रेलियाचा हा सलामीवीर फलंदाज आत्तापर्यंत विश्वचषकात भारत वगळता इतर टीमवर भारी पडला आहे. टीम इंडिया विरुद्ध ट्रेविड हेडनं आतापर्यंत 8 सामने खेळले असून केवळ 29.71 च्या सरासरीनं 208 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 94.97 राहिला आहे. टीम इंडिया विरुद्ध ट्रॅव्हिसची सर्वोच्च धावसंख्या 51 धावा आहे.
डेव्हिड वॉर्नर
ऑसी संघाचा स्फोटक आणि तितकाच खट्याळ फलंदाज म्हणून डेव्हिड वॉर्नर ओळखला जातो. हा स्फोटक सलामीवीर टीम इंडियासाठी नेहमीच अडचणीचं कारण ठरला आहे. वॉर्नर मैदानावर उतरला की, धावांचा पाऊस ठरलेलाच. वॉर्नरनं टीम इंडिया विरुद्धच्या 26 सामन्यांच्या 25 डावांमध्ये 50.62 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीनं 1215 धावा केल्या आहेत. या काळात त्यानं तीन शतकं आणि नऊ अर्धशतकं झळकावली आहेत.
मिचेल मार्श
विश्वचषक 2023 फायनलमध्ये सहभागी होणारा एकही फलंदाज त्याच्या जवळपासही नाही. त्यानं टीम इंडियाविरुद्ध 65.42 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीनं धावा केल्या. मिचेल मार्शनं टीम इंडियाविरुद्धच्या 11 वनडे सामन्यांच्या 10 डावांमध्ये आतापर्यंत 458 धावा केल्या आहेत. या काळात त्यानं एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत. टीम इंडिया विरुद्ध त्याचा स्ट्राईक रेटही उत्कृष्ट आहे. तो 116 च्या स्ट्राईक रेटनं धावा करतो.
स्टिव्ह स्मिथ
टीम इंडिया विरुद्धच्या 28 सामन्यांच्या 24 डावांमध्ये 54.41 च्या मजबूत फलंदाजीच्या सरासरीनं 1306 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेटही 100.84 राहिला आहे. स्मिथनं टीम इंडिया विरुद्ध आतापर्यंत 5 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत. स्पिनर्सविरुद्धही तो चांगला खेळू शकतो.
मार्नस लॅबुशेन
कसोटी क्रिकेटच्या या दिग्गज खेळाडूनं एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाविरुद्ध सरासरी कामगिरी केली आहे. त्यानं टीम इंडियाविरुद्ध 13 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 35.18 च्या सरासरीनं आणि 89.37 च्या स्ट्राईक रेटनं 387 धावा केल्या आहेत. टीम इंडिया विरुद्ध त्याची सर्वोत्तम धावसंख्या 72 आहे.
ग्लेन मॅक्सवेल
विश्वचषक 2023 मधील टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया वनडे इतिहासात सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या मॅक्सवेलनं टीम इंडिया विरुद्ध 134 च्या स्फोटक स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंमध्ये स्ट्राईक रेटच्या बाबतीत त्याच्या जवळ कोणीही नाही. त्याच्यानंतर मिचेल मार्शचा नंबर लागतो ज्यानं टीम इंडिया विरुद्ध 116 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत.
जोस इंग्लिस
जोस इंग्लिस या ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाजानं या वर्षी टीम इंडिया विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला आहे. त्याने टीम इंडियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले असून त्यामध्ये त्यानं 77 धावा केल्या आहेत. येथे त्याची फलंदाजीची सरासरी 25.66 आणि स्ट्राईक रेट 95 आहे. त्याने एकदा भारताविरुद्ध 45 धावा केल्या आहेत.