मुंबई: श्रीलंका सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे (Sri Lanka cricket) सदस्यत्व रद्द केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका सरकारमध्ये काहीही सुरळीत सुरू नाही. श्रीलंका क्रिकेटच्या सध्याच्या प्रशासकीय मंडळावर श्रीलंका सरकारने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. गेल्या गुरुवारी श्रीलंकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांनी श्रीलंका क्रिकेटची सध्याची प्रशासकीय समिती बरखास्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर करून घेतला.
श्रीलंका क्रिकेटमध्ये सरकारच्या या हस्तक्षेपानंतर आयसीसीने शुक्रवारी एक बैठक बोलावली, ज्यामध्ये श्रीलंका क्रिकेटच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. श्रीलंका क्रिकेट बोर्डातील सरकारचा हा निर्णय आयसीसीला आवडला नाही आणि त्यामुळे श्रीलंका क्रिकेटचे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. आयसीसीने सदस्य म्हणून श्रीलंकेवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
ICC ने निलंबित केल्यास काय होईल?
जर आयसीसीने कोणत्याही देशाच्या क्रिकेट बोर्डाला निलंबित केले, तर बंदी उठेपर्यंत तो देश कोणत्याही प्रकारच्या आयसीसी इव्हेंटचा भाग होऊ शकत नाही. याचा अर्थ श्रीलंकेचे सदस्यत्व बहाल होत, नाही तोपर्यंत श्रीलंकेचा क्रिकेट संघ आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळू शकणार नाही.