ICC Cricket World Cup 2023 Final : पुणे : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान आज (रविवारी) रंगणारा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी पुणेकरांनी जय्यत तयारी केली आहे. हा महामुकाबला मोठ्या पडद्यावर पाहता यावा, यासाठी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व राजकीय नेतेमंडळींनी विशेष व्यवस्था केली, हॉटेल-रेस्तराँमध्येही मोठे पडदे लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर भारतीय संघाच्या विजयासाठी पुण्यनगरीचे आराध्यदैवत गणरायाला साकडे घालण्यात आले आहे.
जनसंपर्क कार्यालयात थेट प्रक्षेपण
अहमदाबादेतील नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात महामुकाबला होणार आहे. त्याची जबरदस्त क्रेझ पुण्यात सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक नेत्यांनी आपापल्या जनसंपर्क कार्यालयांत अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण आयोजित करून क्रिकेटप्रेमी मतदारांना निमंत्रित केले आहे. क्रिकेट रसिकांच्या मनोरंजनासाठी ढोल-ताशे, फटाके, ध्वनियंत्रणा, तिरंगी ध्वज, टॅटूचीही सोय करण्यात आली आहे.
विजयासाठी होम-हवन, महाआरती
अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजय मिळावा, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेकडून होमहवन करण्यात आले. याशिवाय अनेक गणेश मंडळांनी गणरायाची महाआरती करून उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप केले.
रेस्तराँमध्ये सवलतींचा वर्षाव
शहरातील अनेक हॉटेल-रेस्तराँचालकांनी अंतिम सामन्याच्या थेट प्रक्षेपणासाठी मोठे पडदे लावले असून, क्रिकेटप्रेमींना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये खाद्यपदार्थ व मद्य खरेदीवर काही टक्के सवलत, एका डिशवर एक डिश फ्री अशा सवलतींचा समावेश आहे. आप्तस्वकीय व मित्रमंडळींसोबत एकत्र बसून सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी जिल्ह्यात फार्महाउस बुकिंगला मोठी पसंती दिली आहे.