मुंबई: टीम इंडियाने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला पण आता या ऐतिहासिक विजयानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. टी-20 वर्ल्डकपदरम्यान रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात कोणतंही बोलणं होत नसल्याचा दावा करण्यात आला होता, पण त्यानंतर एका रात्रीत असं काही घडलं ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. प्रसिद्ध क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी पॉडकास्टमध्ये दावा केला आहे की, 2024 च्या T20 वर्ल्ड कपच्या पहिल्या दिवशी झालेल्या नेट सेशनमध्ये रोहित आणि हार्दिक एकमेकांशी बोलत नव्हते. पहिल्या दिवशी दोघेही कुठेच दिसले नाहीत, पण दुसऱ्या दिवशी सर्व काही बदलले, असा दावा त्यांनी केला.
दुसऱ्या दिवशी रोहित-हार्दिकची चर्चा झाली
विमल कुमार यांनी दावा केला की, रोहित-हार्दिक दुसऱ्या दिवशी एकत्र दिसले होते. दोघेही एका कोपऱ्यात एकत्र बसले होते आणि दोघांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. रोहित आणि हार्दिक यांच्यात ज्या प्रकारे संभाषण सुरू होते, ते या संघातील वातावरणाचे स्पष्ट वर्णन करत होते. त्यानंतर हार्दिक आणि रोहितने पुढील तीन दिवस एकत्र फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव केला. वातावरण इतकं छान झालं की, दोघेही एकमेकांची चेष्टा करत होते. टीम इंडियाच्या चांगल्या वातावरणाचे संपूर्ण श्रेय विमल कुमार राहुल द्रविडला देतात. हार्दिक आणि रोहित शर्मा यांच्यातील बोलणं आयपीएल 2024 दरम्यान बंद झाले. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले.
राहुल द्रविडने काय केले?
मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडने टीम इंडियामध्ये एकता कशी राखली, याबद्दल पत्रकार विमल कुमार यांनी सांगितले की, T20 विश्वचषकादरम्यान राहुल द्रविडने संपूर्ण संघाला एकजूट ठेवले. विराट कोहली, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा या खेळाडूंना त्यांनी कायम सोबत ठेवले. राहुल द्रविडच्या मेहनतीलाही फळ मिळाले. संपूर्ण T20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माची कामगिरी अप्रतिम होती आणि हार्दिक पांड्यानेही उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर टीम इंडियाने 11 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली. 2007 च्या T20 विश्वचषकानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच T20 चॅम्पियन बनली.