मेलबर्न: भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पटकन चिडतात, असा चिमटा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने काढला आहे. पॉण्टिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कोहलीचा खराब फॉर्म चिंतेचा विषय असेल आणि इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूला पाच वर्षांत केवळ दोन शतके करून कसोटी संघात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. मात्र, त्याने कोहलीच्या पुनरागमनाच्या क्षमतेचेही कौतुक केले.
या टिप्पणीवर गंभीर यांनी सांगितले होते की, पॉण्टिंगने भारतीय क्रिकेटबद्दल काळजी करण्याची गरज नाही. या टिप्पणीवर पॉण्टिंगने सांगितले की, प्रतिक्रिया वाचून मला आश्चर्य वाटले, परंतु मी प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ओळखतो… ते खूप लवकर चिडतात, त्यामुळे मला आश्चर्य वाटत नाही की त्यांनी पलटवार केला. मला त्यांच्याकडून अशा अपेक्षा नाहीत. आमचा एकमेकांविरुद्ध खूप इतिहास आहे. मी त्यांना दिल्ली कॅपिटल्समध्ये प्रशिक्षण दिले आहे आणि ते खूप चुळबुळ्या स्वभावाचे आहेत.
आपण केलेले वक्तव्य हे कोणत्याही प्रकारे कोहलीसाठी खोचक नव्हते. मी खरंतर त्यानंतर म्हणालो की, त्याने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली आहे आणि तो इथे परत येण्यास उत्सुक आहे… जर तुम्ही विराटला विचाराल तर मला खात्री आहे की, तो थोडासा चिंतेत असेल की त्याने मागील वर्षांसारखे शतक झळकावलेले नाही, असे पॉण्टिंग म्हणाला.