चंदीगड : भारतीय हॉकी संघाचा माजी स्टार खेळाडू आणि हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्याविरोधात चंदीगड पोलिसांनी महिला प्रशिक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चंदीगडच्या एसपींची भेट घेतल्यानंतर महिला प्रशिक्षकाने क्रीडामंत्र्यांच्या विरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्री संदीप सिंह यांच्यावर कनिष्ठ महिला प्रशिक्षकाने आरोप केल्यानंतर डीजीपींनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली. त्यात आयपीएस ममता सिंह व समर प्रताप सिंह यांच्यासह राजकुमार कौशिक यांचा समावेश आहे. ममता सिंह एसआयटीचे नेतृत्व करणार आहेत. डीजीपींनी या प्रकरणाच्या संपूर्ण तपासाचा लवकर अहवाल मागवला आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चंदीगड येथील सेक्टर २६ पोलिस स्टेशनमध्ये कलम-३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर २०२२ रोजी महिला प्रशिक्षकाने चंदीगड पोलीस मुख्यालयात जाऊन एसएसपींची भेट घेतली आणि तिची तक्रार नोंदवली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण तपासासाठी चंदीगढच्या सेक्टर २६ पोलीस ठाण्यात पाठवले होते. आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, क्रीडा राज्यमंत्री संदीप सिंह यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन महिला प्रशिक्षकाच्या आरोपांचे फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, माझ्याविरोधात कारस्थान रचण्यात आले आहे. मला त्यात नाहक गोवण्यात येत आहे. महिला प्रशिक्षक पंचकूलात राहण्यासाठी हे आरोप करत आहेत. याविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीचीही मागणी केली आहे. संदीप यांनी तपास पूर्ण होईपर्यंत आपण क्रीडा विभागाचे काम पाहणार नसल्याचे जाहीर केले .या प्रकरणाची माहिती त्यांनी सभापती ज्ञानचंद गुप्ता यांनाही दिली आहे.