आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाची हाराकिरी बघायला मिळाली. भारतीय संघाला या स्पर्धेतील साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर टिका होऊ लागली आहे. भारतीय संघाच्या हाराकिरीमुळे हरमनप्रीत कौरचं कर्णधारपद धोक्यात आलं आहे. महिला संघाचे हेड कोच अमोल मजूमदार, निवड समितीचे सदस्य आणित बीसीसीआय यांच्यात आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. मात्र २०२० नंतर भारतीय संघाला फायनलमध्ये प्रवेश करता आलेला नाही. भारतीय संघाची कामगिरी सातत्याने खालावत गेल्याचे दिसून आले. यासह खराब क्षेत्ररक्षण आणि फलंदाजांची कामगिरीही खालावली. याचा फटका आता हरमनप्रीत कौरला बसण्याची शक्यता आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्यानंतर भारतीय संघाने दमदार कमबॅक करत पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत केलं खरं, मात्र महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं.
हरमनप्रीतचं कर्णधारपद धोक्यात?
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या बैठकीत हरमनप्रीतच्या भविष्याबाबत चर्चा केली जाऊ शकते. टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ २४ ऑक्टोबरपासून वनडे मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. हरमनप्रीतला खेळाडू म्हणून संघात स्थान मिळेल. परंतु, ती कर्णधार म्हणून खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.