पुणे : मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरून वादाचे मळभ दूर झाले असून भारतीय कुस्ती संघटनेने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातच स्पर्धा घेण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही जानेवारी महिन्यात कोथरूड, पुणे येथे होणार आहे. याचे अधिकृत पत्र दिल्ली येथे भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंग यांनी आयोजक मुरलीधर मोहोळ यांना दिले आहे.
भारतीय कुस्ती संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते.
मात्र महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील वाद उफाळून आल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर संघटनेची संलग्नताच काढून घेताना महाराष्ट्रात अस्थायी समितीची स्थापना केली होती.
यानंतर अस्थायी समितीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार असल्याची घोषणा केली. त्याबरोबरीने राज्य कुस्तीगीर संघटनेने देखील अहमदनगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र काल राज्य कुस्तीगीर संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी राजीनामा सुपूर्त केला. त्यानंतर पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला.
या स्पर्धेचे आयोजन भाजप राज्य सरचिटणीस व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने कोथरूड येथे करण्यात आले आहे. आज भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंग यांच्या हस्ते त्यांनी स्पर्धा आयोजनाचे अधिकृत पत्र स्वीकारले.
यावेळी राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, संदीप भोंडवे व हिंद केसरी योगेश दोडके उपस्थित होते.