BCCI : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर आता टीम इंडियासह हेड कोच गौतम गंभीर याच्यावर टीका होऊ लागल्याचे दिसत आहे. बीसीसीआय सुद्धा खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता बीसीसीआयकडून आता नियम कडक करण्यास सुरूवात झाली आहे. बीसीसीआयने आता खेळाडूंचा पगार कापण्यास सुरूवात करणार आहे. त्यामुळे खेळाडूंना आता चांगली कामगिरी केली नाही तर चांगल्या पगारापासून लांब राहावं लागणार आहे.
खेळाडूंच्या पगारात होणार कपात..
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली तेव्हा त्या बैठकीत खेळाडूंच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जसं खेळाल तसे पैसे मिळणार, अशी नवी कॉर्पोरेट पॉलिसी आता बीसीसीआयकडून लागू करण्यात येणार आहे. आता खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांना मानधन दिलं जाईल, अशी माहिती मिळत आहे.
चांगली कामगिरी, चांगला पगार..
जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत असेल, तर त्याला त्यानुसार त्याला मानधन मिळेल. पण, जर एखादा खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकत नसेल, तर त्याच्या मानधनात मात्र कपात केली जाईल. यामुळे खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याचं दडपण येईल, असं मानलं जात आहे. कारण अपयशी ठरल्यास खेळाडूचं मानधन कमी होण्याबरोबर संघातील जागा देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.
काय आहेत नवे नियम?
बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार, खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासह संपूर्ण स्पर्धेसाठी सोबत राहू शकणार नाही. खेळाडूंचे कुटुंबीय त्यांच्यासह फक्त 2 आठवडे राहू शकतात. ज्यामुळे खेळाडूंना स्पर्धेवर लक्ष देता येईल. जर स्पर्धा किंवा मालिका 45 दिवस अथवा त्यापेक्षा अधिक दिवसांची असेल तर खेळाडूंचे कुटुंबीय फक्त 14 दिवस त्यांच्यासह राहू शकतात. जर खेळाडूंच्या सामनाचं वजन 150 किलोपेक्षा अधिक असेल तर बीसीसीआय खेळाडूंच्या सामनासाठी अधिक पैसे देणार नाही, असा नियम सुद्धा लागू करण्यात आला आहे.