Mohammed Shami : भारतीय संघ बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर दुखापतीमुळे संघाबाहेर झालेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. तो आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं.
रणजी ट्रॉफीतून करणार कमबॅक..
बुधवार (१३ नोव्हेंबर) पासून बंगाल आणि मध्यप्रदेश या दोन्ही संघांमध्ये एलीट ग्रुप सी चा सामना रंगणार आहे. या सामन्यातून मोहम्मद शमी कमबॅक करणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने आपल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले की, ‘ ही भारतीय क्रिकेटसाठी आणि बंगाल रणजी संघासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तो बुधवारपासून सुरु होणाऱ्या मध्यप्रदेशविरुद्धच्या सामन्यातून कमबॅक करणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला शेवटचा सामना खेळणारा शमी आता मध्यप्रदेशविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करताना दिसेल.’
तसेच आपल्या प्रेस रिलीजमध्ये त्यांनी पुढे लिहिले आहे की, ‘बंगाल संघात शमीचा समावेश होणं हे नक्कीच फायदेशीर आहे. बंगालचा संघ दुसऱ्या फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.’ रणजी ट्रॉफीसाठी बंगालच्या संघात स्थान मिळणं हे मोहम्मज शमीसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कारण शमी गेल्या वर्षभरापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्यामुळे त्याला आपली फिटनेस सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीतील पुढील २ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली, तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघात संधी मिळू शकते.