मुंबई: टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला असून, सर्व अंदाज खरे ठरवत बीसीसीआयने माजी सलामीवीर गौतम गंभीरकडे टीम इंडियाची जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी 9 जुलै रोजी गंभीरच्या नावाची घोषणा करत टीम इंडियामध्ये त्याचे स्वागत केले. गेल्या महिन्यापर्यंत गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक होता, जिथे त्याच्या नेतृत्वाखाली केकेआरने 10 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले.
राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे, ज्याने टी20 विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयासह आपला प्रवास संपवला. गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती बऱ्याच काळापासून अपेक्षित होती. कोलकाता त्याच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल चॅम्पियन झाल्यापासून बीसीसीआय त्याच्या संपर्कात होती, त्यानंतर गंभीरने औपचारिकपणे अर्ज केला होता. गेल्या महिन्यात क्रिकेट सल्लागार समितीला त्याने मुलाखतही दिली होती.
It is with immense pleasure that I welcome Mr @GautamGambhir as the new Head Coach of the Indian Cricket Team. Modern-day cricket has evolved rapidly, and Gautam has witnessed this changing landscape up close. Having endured the grind and excelled in various roles throughout his… pic.twitter.com/bvXyP47kqJ
— Jay Shah (@JayShah) July 9, 2024
किती दिवस मुख्य प्रशिक्षक राहणार ?
राहुल द्रविड नोव्हेंबर 2021 मध्ये टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला आणि त्याला 2 वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला होता. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याने द्रविडचा कालावधी संपला होता, परंतु असे असतानाही बीसीसीआयने त्याला टी-20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, गंभीरला सुरुवातीपासूनच दीर्घकाळ कार्यकाळ मिळेल. BCCI ने मे महिन्यात नवीन मुख्य प्रशिक्षकाची जाहिरात प्रसिद्ध केली, तेव्हा नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2027 पर्यंत म्हणजेच साडेतीन वर्षांचा असेल, असे स्पष्ट केले होते.