नवी दिल्ली: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या गेममध्ये काहीही सांगता येत नाही, असे म्हटले जाते. एका चेंडूवर विकेट पडू शकते आणि त्याच चेंडूवर फलंदाज षटकारही मारू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या एका युवा गोलंदाजाने एका षटकात 6 विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे. शेवटच्या षटकात विरोधी संघाला विजयासाठी 5 धावांची गरज होती आणि त्यांच्या 6 विकेट शिल्लक होत्या. पण धावांचा बचाव करणाऱ्या संघाच्या गोलंदाजाने शेवटच्या षटकात सलग 6 विकेट घेत खेळ फिरवला.
गारेथ मोर्गन असे या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे नाव आहे. ऑस्ट्रेलियन क्लब क्रिकेटमध्ये या गोलंदाजाने हा चमत्कार केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या थर्ड डिव्हिजन क्लब क्रिकेटमध्ये गारेथ मोर्गनने एका षटकात सलग 6 चेंडूंवर 6 खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. क्लब क्रिकेटमध्ये एका षटकात गोलंदाजाने 6 विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधीही क्लब क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे हा पराक्रम फक्त ऑस्ट्रेलियातच झाला आहे. यापूर्वी 2017 मध्ये अॅलेड कॅरीने क्लब क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली होती.
40 षटकांच्या सामन्यात मुदगीराबा क्लबकडून खेळणाऱ्या गारेथ मोर्गनने सरफर्स पॅराडाइज क्लबविरुद्ध एका षटकात 6 विकेट घेतल्या. 40व्या षटकात सरफर्सला विजयासाठी 5 धावांची गरज होती. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुदगीराबा क्लबचा कर्णधार जेक जेराल्डला मोर्गनने इथन वेल्सकरवी झेलबाद केले. दुसऱ्या चेंडूवर त्याने कॉनर मॅथेसनला ओरी फिनकरवी झेलबाद केले. गारेथच्या तिसऱ्या चेंडूवर मायकेल कर्टिनला इशान संधूने झेलबाद केले. पाचव्या चेंडूवर रिले एकरस्ली बोल्ड झाला, तर बोर्डी फेलनही सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा प्रकारे पॅराडाईज क्लबने 4 धावांनी विजय मिळवला.