मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता क्रिकेटर हार्दिक पंड्या व कृणाल पंड्या या दोघांना बदनामीची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. सावत्र भाऊ वैभव पंड्याने फोटो व व्हिडिओ मॉर्फ करून बदनामी करण्याची धमकी दिल्याचे चौकशीतून उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, याबाबतच्या अधिक तपासासाठी वैभव पंड्याचा मोबाईल, लॅपटॉप व आयपॅड जप्त केला आहे.
पंड्या बंधूंची तब्बल ४.३० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी त्यांचा सावत्र भाऊ वैभव पंड्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणी त्याला १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पंड्या बंधूंनी वैभवसोबत २०२१ मध्ये पॉलिमर व्यवसायासाठी कंपनी स्थापन केली होती. देशातील बड्या कंपनीसोबत ही कंपनी पॉलिमरचा व्यवसाय करत होती. याच कंपनीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक झाली. वैभव त्या कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहत होता.
वैभवने करारातील अटींचा भंग केला. त्याने दोन्ही भावांना अंधारात ठेवून त्याच व्यवसायात स्वत:ची कंपनी स्थापन केली. त्यानंतर वैभवने या कंपनीतील रक्कम कथित स्वरूपात नव्याने स्थापन केलेल्या कंपनीत वळवली. यामध्ये त्याने पंड्या बंधूंची कोट्यवधींची फसवणूक केली.
वैभव पंड्याला पोलिसांकडून अटक
हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनी त्यांचा सावत्र भाऊ वैभव पंड्या याच्याविरुद्ध 4.3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने संशयित आरोपी वैभव पंड्याला 8 एप्रिल रोजी अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
भागीदारी कराराचे उल्लंघन
पॉलिमरचा व्यवसाय हा 2021 मध्ये हार्दिक, कृणाल आणि वैभव या तिघांनी भागीदारीत सुरू केला होता. यामध्ये हार्दिक आणि कृणाल हे दोघे प्रत्येकी 40 टक्के गुंतवणूक करतील असे ठरले होते. तर सावत्र भाऊ वैभव 20 टक्के गुंतवणूक करेल आणि दैनंदिन कामकाज पाहील, अशा अटी होत्या. नफा त्याच प्रमाणात वाटला जाणार होता. मात्र, वैभवने भागीदारी कराराचा भंग केला आणि हार्दिक-कृणालला न कळवता त्याच व्यवसायात दुसरी कंपनी स्थापन केली. त्यात त्यांची फसवणूक केली.