मेलबर्न : गोलंदाजीत सॅम करणने दिलेले धक्के व त्यांनंतर बेन स्टोक्सने पडझड झाल्यानंतर इंग्लंडला सावरणारी खेळी करताना पाकिस्तानवर मात करून विश्वकरंडकावर दुसऱ्यांदा आपले नाव कोरले. अंतिम लढतीत पाकिस्तानने दिलेले १३७ धावांचे आव्हान इंग्लंड संघाने सहज पार करताना विजय साकारला.
मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ८ बाद १३७ धावा केल्या. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करणने ४ षटकांत केवळ १२ धावांच्या मोबदल्यात पाकिस्तानचे ३ गडी बाद केले. त्याला आदिल रशीद व ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी २ तर बेन स्टोक्सने एक गडी बाद करताना सुरेख साथ दिली. पाकिस्तान संघाकडून सर्वाधिक ३८ धावांची खेळी शान मसूदने केली. सलामीवीर व कर्णधार बाबर आझमने ३२, मोहम्मद रिझवानने १५ तर शादाब खानने आक्रमक २० धावांची खेळी केली. कोण्त्याही पाकिस्तानी फलंदाजांना मोठी भागीदारी रचता आली नाही, यामुळेच पाकिस्तानचा डाव १३७ धावांवर अडकला.
इंग्लंडने देखील अडखळतच सुरुवात केली. सलामीवीर अॅलेक्स हेल्स पहिल्याच षटकांत बाद झाला. जोस बटलर व फील सॉल्ट ही जोडी जमली असे वाटत असतानाच सॉल्ट १० धावा करून परतला. इंग्लंडच्या ४५ धावा फलकावर असताना बटलरने देखील पॅव्हेलियन गाठले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बेन स्टोक्सने सामन्याची सगळी सूत्रे हाती घेत इंग्लंडचा किल्ला अभेद्य राखला. ४९ चेंडूत ५ चौकार व १ षटकारासह बेन स्टोक्सने ५२ धावांची संयमी खेळी केली. हॅरी ब्रुकने २० तर मोईन अलीने १९ धावांची खेळी करताना बेन स्टोक्सला सुरेख साथ दिली.
पाकिस्तान संघाकडून हॅरिस रौफने २ गडी बाद केले. शाहीन आफ़्रिदी, शादाब खान व मोहम्मद वासिम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सॅम करणने केलेल्या भेदक गोलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.