ऍडलेड : इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर व अॅलेक्स हेक्स यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताला पराभूत करताना टी -२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने दिलेले १६९ धावांचे आव्हान इंग्लंडच्या सलामीवीरांनी केवळ १६ षटकांत पार करताना भारतीय गोलंदाजांची पाळता भुई थोडी केली.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या. यात हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी करताना केवळ ३३ चेंडूत ४ चौकार व ५ षटकार मारताना ६३ धावांची खेळी केली. विराट कोहलीने ४० चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ५० धावा केल्या. रोहित शर्माने २७ तर सूर्याकुमार यादवने १४ धावांचे योगदान दिले. इंग्लंड संघाकडून ख्रीस जॉर्डनने ४३ धावत ३ तर आदिल रशीद व ख्रिस वोक्सने प्रत्येकी १ गडी बाद केला.
इंग्लंड संघाने १६ षटकांत १७० धावा करताना विजयला गवसणी घातली. सलामीवीर अॅलेक्स हेक्सने दमदार फलंदाजी करताना ४७ चेंडूत ४ चौकार व ७ षटकार लागावताना ८६ धावांची नाबाद खेळी केली. त्याला कर्णधार जोस बटलरने ४९ चेंडूत ९ चौकार व ३ षटकार मारताना हेक्सला सुरेख साथ दिली. दोन्ही खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी करताना तब्बल ४ षटके राखून विजय संपादित केला.
सट्टेबाजांची दिवाळी
सट्टेबाजांसाठी आजचा दिवस दिवाळी साजरा करणारा ठरला. आजच्या लढतीमध्ये भारत ‘फेव्हरिट’ असल्याने अनेकांनी भारताच्या बाजूने पैसे लावल्याची माहिती आहे. मात्र, ज्या पद्धातीने इंग्लंड संघाने फलंदाजी करताना विजय साकारला त्यामुळे अनेक सट्टेबाजांना मोठा आर्थिक लाभ झाला असण्याची शक्यता आहे. आजच्या लढतीमध्ये भारतीय खेळाडू सपशेल अपयशी ठरल्याने नक्कीच सट्टेबाजांची चांदी झाली आहे.