पुणे : भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने, महाराष्ट्र रोलबॉल संघटना व पुणे जिल्हा रोलबॉल संघटना यांच्या वतीने ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा रोलबॉल मैदानावर २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रोलबॉल संघटनेचे सचिव चेतन भांडवलकर यांनी दिली.
ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात येणार असून स्पर्धेचा पहिल्या टप्प्यातील लढती जिल्हा रोलबॉल मैदानावर घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा मुले व मुली अशा दोन्ही विभागात होणार असून या स्पर्धेत हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड , कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, नागालँड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र व ओडिसा हे संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा रोलबॉल मैदानावर करण्यात येणार असून यावेळी क्रीडा व युवकचे संचालक सुहास देवसे, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, महाराष्ट्र रोलबॉलचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, जिल्हा रोलबॉलचे अध्यक्ष गजानन थरकुडे, नरसिंग लगड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.