पुणे : डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर व व्हीआयटी पीव्हीपी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत डीवाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्ट संघाला ३० धावांनी पराभूत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना डीवाय पाटील संघाने निर्धारित ८ षटकांत २ बाद ७१ धावसंख्या उभारली.
यात सलामीवीर अभिषेक चौधरीने दमदार फलंदाजी करताना २६ चेंडूत ५ चौकार व २ षटकार लागवताना ५१ धावांची नाबाद खेळी केली. ब्रिक्स संघाकडून कैवल्य बोर्डे व अमन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. ब्रिक्स संघाला निर्धारित ८ षटकांत ८ बाद ४१ धावाच करता आल्या. ब्रिक्स संघाकडून शिव जाधवने सर्वाधिक ९ धावा केल्या. डीवाय पाटील संघाकडून चैतन्य शिर्केने ३, शामल पलोड, रंजन कुमार व मौलिक भारद्वाज यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसऱ्या लढतीत व्हीआयटी पीव्हीपी संघाने मराठवाडा मित्रमंडळ संघाला ९ गडी राखून पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. मराठवाडा मित्रमंडळ संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत २ बाद ८८ धावा केल्या. यात कौस्तुभ तेलवेकर याने दमदार फलंदाजी करताना ३१ चेंडूत १० चौकार व १ षटकार मारताना नाबाद ६० धावांची खेळी केली. त्याला आर्य बापटने २२ धावा (३ चौकार) करताना सुरेख साथ दिली.
मराठवाडा मित्रमंडळ संघाने दिलेले आव्हान व्हीआयटी पीव्हीपी संघाने केवळ ६.२ षटकांत १ बाद ८९ धावा करताना मोडून काढले. व्हीआयटी पीव्हीपी संघाकडून नमन पारेखने ३३ (५ चौकार, १ षटकार), सनी गुंजाळने नाबाद २४ (३ चौकार, १ षटकार) तर मोहित जाधवने नाबाद १६ (२ चौकार) धावा करताना संघाला विजय मिळवून दिला.