मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे. पीसीबीने या स्पर्धेचे वेळापत्रकही तयार केले असून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या दौऱ्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बीसीसीआय टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवायला तयार नसल्याची बातमी आहे. अशा परिस्थितीत हायब्रीड मॉडेलचा मुद्दाही ऐरणीवर येत आहे. या सगळ्या दरम्यान पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. या खेळाडूने भारताला पाकिस्तानात न येण्याचा सल्ला दिला आहे.
टीम इंडियाला पाकिस्तानात न जाण्याचा सल्ला मिळाला
पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने मोठे वक्तव्य केले आहे. दानिश कनेरियाचे मत आहे की, सध्या पाकिस्तानमधील वातावरण योग्य नाही, त्यामुळे टीम इंडियाने तेथे दौरा करू नये. गेल्या अनेक वर्षांपासून भारतालाही पाकिस्तानमधील खेळाडूंच्या सुरक्षेची चिंता आहे आणि त्यामुळे ते आपला संघ पाकिस्तानात पाठवत नाही. या दोन संघांमध्ये कोणतीही मालिका खेळली जात नाही. हे दोन संघ फक्त आशिया चषक किंवा आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात.
दानिश कनेरियाचे मोठं वक्तव्य
स्पोर्ट्स तकशी बोलताना दानिश कनेरिया टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्यावर म्हणाला, ‘पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊ नये, असे मला म्हणायचे आहे. पाकिस्तानने याचा विचार करावा आणि त्यानंतर आयसीसी निर्णय घेईल. बहुधा ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाईल. हे दुबईमध्ये होऊ शकते, ही चांगली गोष्ट असेल. कनेरिया पुढे म्हणाला, ‘खेळाडूंची सुरक्षा ही पहिली प्राथमिकता आहे. आदर ही दुसरी प्राथमिकता आहे. माझ्या मते बीसीसीआय खूप चांगले काम करत आहे. मात्र, अंतिम निर्णय सर्व देश मान्य करतील.
कोण आहे दानिश कनेरिया?
दानिश कनेरियाचा जन्म 16 डिसेंबर 1980 रोजी कराचीमध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. दानिश कनेरिया हे पाकिस्तान क्रिकेटमधील मोठे नाव आहे. पण हा खेळाडू आता अनामिक जीवन जगत आहे. कनेरियाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो संघाचा भाग होता, तेव्हा त्याला पाकिस्तानमध्ये भेदभावाचा सामना करावा लागला. कारण तो हिंदू होता. त्याच्यावर आजीवन बंदीही घालण्यात आली होती. पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक अनिल दलपत त्याचा चुलत भाऊ आहे. पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारे अनिल आणि कनेरिया हे दोनच हिंदू क्रिकेटपटू आहेत.