नवी दिल्ली: स्फोटक सलामीवीर शेफाली वर्माच्या झंझावाती खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीगच्या (WPL) अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीने 8 सामन्यांत 12 गुणांसह 5 संघांच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत जेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. गुजरातने दिलेल्या 127 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली संघाने 13.1 षटकात 3 गडी गमावून 129 धावा केल्या. शेफालीला तिच्या दमदार खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना रविवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजेत्याशी होईल. शफाली वर्माने तिच्या खेळीत पाच षटकार आणि सात चौकार लगावले. तिने 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. जेमिमाह रॉड्रिग्ज ३८ धावा करून नाबाद राहिली. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा गुजरातचा निर्णय चुकीचा ठरला आणि चौथ्याच षटकातच दोन फलंदाज १२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. कॅप्टन बेथ मुनी पहिल्याच षटकात खाते न उघडता कॅपच्या चेंडूवर बाद झाली.
भारती फुलमाळीच्या 36 चेंडूत 42 धावा आणि कॅथरीन ब्राइसच्या नाबाद 28 धावा झाल्या नसत्या तर गुजरातची धावसंख्या आणखी वाईट झाली असती. दक्षिण आफ्रिकेच्या अनुभवी मारियान कॅपने चार षटकांत १७ धावा देत दोन गडी बाद केले. शिखा पांडे आणि मिन्नू मणी यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. डी हेमलताला जेस जोनासेनने बोल्ड केले. तर लॉरा वोलवॉर्टला कॅपने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पाचव्या षटकात स्कोअर बोर्डवर 16 धावा लागल्या असताना गुजरातचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये होते.
ऑस्ट्रेलियाची अनुभवी खेळाडू ऍशले गार्डनर (12) आणि फोबी लिचफिल्ड (21) यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि चौथ्या विकेटसाठी 23 धावा जोडल्या. ऑफस्पिनर मनीने गार्डनरला बाद करून ही भागीदारी तोडली. नवव्या षटकात गुजरातची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा होती. मणीच्या चेंडूवर राधा यादवने लिचफिल्डचा अप्रतिम झेल घेतला. 11व्या षटकात 48 धावांवर पाच विकेट पडल्यानंतर फुलमाळी आणि ब्रायस यांनी डावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि 68 धावा जोडल्या. गुजरातचा 8 सामन्यांमधला हा सहावा पराभव असून गुणतालिकेत ते 4 गुणांसह तळाच्या स्थानावर आहे.