पुणे : येरवडा येथील महिला एका हॉस्पिटलमध्ये काम करीत होत्या. आपल्या सुनेने नोकरी केलेली सासू, सासऱ्याला पसंत नसल्याने तिला नोकरी सोडायला लावली. यानंतर महिलेचा पती आकाश याने काही दिवसांसाठी पत्नीला माहेरी आणून सोडले. आम्ही तुमच्या मुलीला घटस्फोटाची नोटीस पाठविणार आहोत. मुलीला इकडे पाठवू नका असे फोन करून सांगितले. हे समजल्यावर महिलेला धक्का बसला. तिला सासरी नांदायचे असल्याने त्या १८ डिसेंबरला सकाळी सासरी आल्या.
माहेराहून सासरी परत आलेल्या सुनेला घरात कोंडून पती व सासू-सासरे निघून गेले. अखेर दोन दिवसांनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून सुनेची सुटका केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पती आकाश रणवरे (वय ३१), सासरे प्रफुल्लाचंद्र रणवरे (६०) आणि सासू स्मिता रणवरे (६०, रा.प्रतीकनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका २७ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहितीनुसार, फिर्यादीला आकाश याने तू इथे कशाला आलीस तुझे घर नाही असे सांगून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले.
पोलिस गेल्यानंतर पती, सासू, सासरे यांनी तिला घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून निघून गेले. दुसऱ्या दिवशी परत येऊन त्यांनी त्यांचे कपडे भरून घेऊन तिला पुन्हा घरात डांबले. दोन दिवसानंतर महिलेने आपल्या माहेरी फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला.
त्यावेळी २२ डिसेंबरला रात्री महिलेचे वडील पोलिसांना घेऊन आले. पोलिसांनी घराचे लॉक तोडून तिला घराबाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.