लंडन : पोर्तुगालचा फ़ूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने सौदी अरबच्या ‘अल नासर क्लब’ सोबत करारबद्ध झाला आहे. ३७ वर्षीय रोनाल्डो या करारामुळे जगातील सर्वात महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता आहे.
नुकताच फुटबॉल विश्वकरंडक संपला असून यात पोर्तुगाल संघाला विशेष कामगिरी करता आली नव्हती. बाद फेरीतील मोरक्को विरुद्धच्या लढतीत त्याला पहिल्या सत्रात मैदानावरच उतरविण्यात आले नव्हते. त्या लढतीत पोर्तुगाल संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवानंतर रोनाल्डोला मैदानाबाहेर रडताना सर्वानी पाहिले होते.
यापूर्वी रोनाल्डोने मॅनचेस्टर युनायटेड आणि रियाल माद्रिद या सारख्या युरोपातील आघाडीच्या क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. सौदी अरेबियाच्या अल नासर क्लब बरोबर करार केल्याने रोनाल्डो प्रथमच आशियाई क्लबचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
या करारामुळे क्लबच्या बरोबरीनेच लीग स्पर्धामध्ये देखील चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे. यामुळे आमचा देश व भविष्यातील खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मदत होणार असल्याचे क्लबने म्हटले आहे.
या करारासाठी रोनाल्डोला सुमारे २०० मिलियन म्हणजे सुमारे १७ अब्ज रुपये वर्षाला मिळणार असलयाचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रोनाल्डो हा सर्वात महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता आहे.
एका वेगळ्या देशात नवी फुटबॉल लीग खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे रोनाल्डोने म्हटले आहे. मी नशीबवान असून युरोपियन फुटबॉलकडून मला सर्व काही मिळाले आहे, त्यामुळे मला आशियातील अनुभव घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे रोनाल्डो म्हणाला.