मुंबई : आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी गेल्या दहा वर्षात हवी तशी झालेली नाही. दहा वर्षात एकही जेतेपद आपल्या झोळीत टाकता आले नाही. त्यामुळे कागदावर भारतीय संघ कितीही मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात जेतेपदाच्या लढाईत एकदमच मागे राहिल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे मोठे आव्हान आता रोहित सेनेवर असणार आहे. पण आव्हान पेलण्यासाठी संघाची बांधणी करणे एकदमच कठीण होऊन बसले आहे.
काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे गेल्या काही दिवसात संघात बरेच प्रयोग करण्यात आले. पण हवी तशी काही कामगिरी दिसली नाही. प्रयोगामुळे टीम इंडियाच्या कामगिरीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकपसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यात टीम इंडियात कोणते खेळाडू खेळणार याची चाचपणी सुरु झाली आहे.
पाचव्या स्थानासाठी चाचपणी
2019 वर्ल्डकपनंतर पाचव्या स्थानासाठी काही खेळाडूंची चाचपणी करण्यात आली. यात के. एल. राहुलचे आकडेच सर्वोत्कृष्ट असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव याचा नंबर येतो. दुसरीकडे, या क्रमांकावर रवींद्र जडेजा, मनिष पांडे, अक्षर पटेल, केदार जाधव यांना संधी मिळाली आहे. पण काही खास करू शकले नाही. सहाव्या स्थानावर हार्दिक पांड्या आणि सातव्या स्थानावर अक्षर पटेल यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.