Cricket News : मुंबई : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये विजय मिळवला. बांगलादेशविरुद्धचा हा सामना पाकिस्तानने 7 विकेट्स राखून जिंकला आणि आता सुपर 4 च्या उर्वरित सामन्यासाठी संघ कोलंबो येथे दाखल झाला आहे. पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरुद्ध 10 सप्टेंबरला होणार आहे.
पुढील सामना 10 सप्टेंबरला होणार…
भारत-पाकिस्तान यांच्यातला साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी भारताची आघाडीची फळी ढासळून टाकली होती. इशान किशन व हार्दिक पांड्या खेळले म्हणून भारत दोनशेपार धावा करू शकला होता. आता दोन्ही संघ पुन्हा भिडणार आहेत आणि यावेळी निकाल पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
या सामन्याबाबत बाबर म्हणाला, मोठ्या सामन्यांचे आम्ही दडपण घेत नाही. बांगलादेशविरुद्धच्या विजयाने आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि आम्ही नेहमीच मोठ्या सामन्यासाठी तयार असतो. भारताविरुद्धच्या सामन्यात आम्ही 100 टक्के योगदान देणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर गोलंदाजांचे कौतुक केले. विशेषतः त्याने हॅरीस रौफ व नसीम शाह यांच्या कामगिरीचा उल्लेख केला.
राहुल, इशान किशन एकत्र खेळ
पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या दोन्ही गट सामन्यांमध्ये फक्त इशान किशन खेळला होता. पण आता राहुल आल्यामुळे कोणाला खेळवायचे याबाबत टीम इंडियाच्या व्यवस्थापनासमोर डोकेदुखी आहे. आता जर आपण कॉम्बिनेशनबद्दल बोललो तर, इशान किशन आणि केएल राहुल दोघेही टीम इंडियामध्ये एकत्र कसे खेळू शकतात. शुभमन गिलने नेपालविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याआधी वनडे फॉरमॅटमधील त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानविरुद्धही गिल 32 चेंडूत केवळ 10 धावा करू शकला. अशा परिस्थितीत गिल बाहेर झाल्यास किशन आणि रोहित शर्मा सलामी देऊ शकतात. वेस्ट इंडिज दौऱ्यातही इशान किशनने गिलसोबत सलामी दिली होती.