नवी दिल्ली: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकही सामना न गमावूनही विनेश फोगटला पदक मिळाले नाही. याचे कारण म्हणजे तिचे वजन प्रमाणापेक्षा 100 ग्रॅम जास्त होते. यामुळेच अंतिम सामन्यापूर्वी तिला अपात्र ठरवण्यात आले आणि तिला कोणतेही पदक मिळाले नाही. यानंतर विनेश क्रीडा न्यायाधिकरणात गेली, जिथे तिचे अपील फेटाळण्यात आले. आता जवळजवळ प्रत्येक चाहत्यांना विनेश फोगटच्या संघर्षाची कहाणी माहित आहे. आता तिचे प्रशिक्षक वूलर एकॉस यांनी एक खुलासा केला आहे, जो खूप धक्कादायक आहे. वूलर एकॉस यांनी सांगितले की, पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान एका क्षणासाठी मला वाटले की, विनेश फोगट आपला जीव गमावू शकते.
विनेश फोगटचा जीव धोक्यात!
विनेश फोगटचे प्रशिक्षक वूलर एकॉस यांनी एका मुलाखतीत सांगितले की, विनेश फोगटने ज्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, ते पाहून एकवेळ असे वाटले की तिला आपला जीव गमवावा लागेल.वूलर एकॉस पुढे म्हणाले, ‘उपांत्य फेरीनंतर तिचे वजन २.७ किलोने वाढले होते. एक तास 20 मिनिटे वर्कआउट करूनही दीड किलो शिल्लक होते. 50 मिनिटांसाठी सॉना सत्र होते, ज्यामध्ये घाम येत नव्हता. असे असूनही विनेशने अनेक कार्डिओ मशीनवर वर्कआउट केले. ती मध्यरात्री ते पहाटे साडेपाचपर्यंत कुस्ती आणि कार्डिओ करत राहिली. अनेकवेळा ती थकव्यामुळे खाली पडली. त्यावेळी मला खरोखरच तिचा जीव धोक्यात आला आहे असे वाटले.
पदक गमावल्यानंतर काय म्हणाली विनेश फोगट?
एवढी मेहनत करूनही जेव्हा विनेशचे वजन 100 ग्रॅमने वाढले, तेव्हा तिला अपात्र ठरवण्यात आले. मात्र, तरीही तिने हिंमत हारली नाही. प्रशिक्षक वूलर एकॉस यांनी सांगितले की, विनेश मला म्हणाली, ‘कोच, निराश होऊ नका. जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूला मी पराभूत केले आहे. मी माझे ध्येय साध्य केले. मी सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक असल्याचे मी सिद्ध केले आहे. आपल्या गेम प्लॅनने काम केले आहे. पदक फक्त एक गोष्ट आहे, कामगिरी महत्त्वाची, असं वूलर एकॉस यांनी सांगितले.