जकार्ता: इंडोनेशियात सुरू असलेल्या आशिया ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये हृदयद्रावक घटना घडली. चीन आणि जपान यांच्यात सामना सुरू असताना ही घटना घडली. या सामन्यात बॅडमिंटन कोर्टवर चीनचे प्रतिनिधित्व झांग झिजी, तर जपानचे प्रतिनिधित्व काझुमा कावाना करत होते. सामन्यादरम्यान चीनचा खेळाडू झांग झिजी कोर्टवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक यूजर्स खेळाडूच्या मृत्यूवर प्रश्नही उपस्थित करत आहेत.
झांग झिजीला रविवारी संध्याकाळी उशिरा जपानच्या काझुमा कावानाविरुद्ध एकेरी सामना खेळत असताना बॅडमिंटन कोर्टवर हृदयविकाराचा झटका आला. पहिला गेम 11-11 असा सुरू असताना अचानक झांग जमिनीवर पडला. त्याच्यावर सामन्याच्या स्थळी उपचार करण्यात आले आणि नंतर ॲम्ब्युलन्सने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, पण त्याला वाचवण्यात यश आले नाही.
“चीनचा एकेरी खेळाडू झांग झिजी रविवारी संध्याकाळी एका सामन्यादरम्यान कोर्टवर कोसळला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले जेथे रात्री 11:20 वाजता त्याचा मृत्यू झाला,” असे बॅडमिंटन एशिया आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PBSI) यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. टूर्नामेंट डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाने त्याच्यावर उपचार केले आणि त्याला दोन मिनिटांत रुग्णालयात नेले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, बॅडमिंटन जगताने एक प्रतिभावान खेळाडू गमावला आहे. पीबीएसआयचे प्रवक्ते ब्रोटो हॅपी यांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणीत झांगला हृदयविकाराचा झटका आल्याचे आढळून आले.
BREAKING: 17-year-old Chinese badminton player Zhang Zhijie has died of cardiac arrest after collapsing on the court during a tournament in Indonesia. pic.twitter.com/X5fg6GJVGH
— Wide Awake Media (@wideawake_media) July 1, 2024
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे. झांग पडल्यानंतर सुमारे 40 सेकंदांचा विराम असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर डॉक्टर त्यांच्या मदतीला धावतात. व्हिडिओमध्ये झांग पडल्यानंतर मदत करण्यासाठी एक माणूस धावताना दिसत आहे, परंतु तो थांबतो आणि पुढील सूचनांसाठी कोर्टच्या बाहेर पाहत असल्याचे दिसते. पीबीएसआयच्या प्रवक्त्याने नंतर पत्रकारांना सांगितले की, वैद्यकीय पथकासाठी एक नियम आहे, ज्यानुसार त्यांना कोर्टवर प्रवेश करण्यापूर्वी रेफरीची परवानगी आवश्यक आहे.