ऑकलंड : सलामीवीर शिखर धवन, शुभमन गिल व श्रेयस अय्यर यांनी केलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंड संघासमोर निर्धारित ५० षटकांत ३०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
ऑकलंड येथील एडन पार्क मैदानावर सुरु असलेल्या लढतीमध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३०६ धावांचा डोंगर उभारला. यामध्ये सलामीवीर शिखर धवन व शुभमन गिल यांनी दमादर १२४ धावांची भागीदारी केली.
शुभमन गिलने सावध फलंदाजी करताना ६५ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांच्या साहाय्याने ५० धावांची खेळी केली. दुसरा सलामीवीर शिखर धवनने देखील आक्रमक फलंदाजी करताना ७७ चेंडूत ७२ धावांची खेळी १३ चौकारांच्या साहाय्याने सजविली.
शुभमन गिल बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने देखील ७६ चेंडूत ८० धावांची खेळी करताना एक बाजू लावून धरली. मात्र त्यानंतर रिषभ पंत (१५ धावा) व सूर्यकुमार यादव (४ धावा) यांना धडाकेबाज सुरुवातीचा फायदा घेता आला नाही.
रिषभ पंत व सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने ३८ चेंडूत ३६ धावा करताना ४ चौकार वसूल केले. शेवटी वाशिंग्टन सुंदरने केवळ १६ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांची आतिषबाजी करताना संघाला
तीनशे धावांचा टप्पा गाठून दिला.
न्यूझीलंड संघाने लढतीत केवळ पाचच गोलंदाजांचा वापर केला. टीम साऊथीने ३, लॉकी फर्गसनने ३ तर ऍडम मिलने एक गडी बाद केला. भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक ७३ धावा टीम साऊथीकडून वसूल केल्या. साऊथीने धवन, श्रेयस अय्यर व शार्दूल ठाकूर यांचे बळी मिळविले.
या लढतीमध्ये न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी ११ धावा अवांतर स्वरूपात दिल्या यात २ बाईज, १ लेग बाईज व तब्बल ८ वाईडबॉलचा समावेश आहे.