दुबई: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने बुधवारी कॅगिसो रबाडा आणि जोश हेझलवूड यांना मागे टाकून आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले. पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्याच्या मॅच-विनिंग बॉलिंग स्पेलमुळे त्याला हे स्थान पटकावता आले. कर्णधार बुमराहने सामन्यात ७२ धावांत ८ बळी घेतल्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव केला आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पर्थ कसोटीपूर्वी बुमराह गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. आता त्याने दक्षिण आफ्रिकेचा रबाडा (८७२ गुण) आणि ऑस्ट्रेलियाचा हेजलवूड (८६० गुण) यांना मागे टाकून कारकीर्दीतील सर्वोत्तम ८८३ गुणांसह रँकिंग गाठले आहे. बुमराहचा सहकारी मोहम्मद सिराजने पर्थ कसोटीत पाच बळी घेतले. त्यामुळे त्याला तीन स्थानांचा फायदा झाला आणि तो २५ व्या स्थानावर पोहोचला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १६१ धावांची शानदार खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम ८२५ गुणांसह इंग्लंडच्या जो रूट (९०३ गुण) मागे टाकून फलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान गाठले. अनुभवी स्टार फलंदाज विराट कोहलीने ३० व्या कसोटी शतकानंतर नऊ स्थानांनी प्रगती करत १३ व्या स्थानावर चढाई सुरू ठेवली आहे. भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने ७३६ गुणांसह सहावे स्थान कायम राखले आहे. पर्थ कसोटीत रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले नसले, तरी कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत त्यांची जोडी अव्वल स्थानावर आहे.