नवी दिल्ली: आयपीएल 2024 च्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्जने मोठा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार बदलला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागी सलामीवीर ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या 17 व्या मोसमात चेन्नईचे नेतृत्व करणार आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून याची पुष्टी करण्यात आली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने विक्रमी 5 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. धोनीने 2022 पूर्वी चेन्नईचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर फ्रँचायझीने रवींद्र जडेजाला कर्णधार बनवले, परंतु जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने सलग अनेक सामने गमावले, त्यानंतर धोनीला स्पर्धेच्या मध्यभागी पुन्हा कर्णधार बनवण्यात आले.
आयपीएल 2024 शुक्रवारपासून (22 मार्च) सुरू होत आहे. सुरुवातीच्या सामन्याच्या एक दिवस आधी, चेन्नई येथे आयोजित प्री-आयपीएल कॅप्टन्स कॉन्क्लेव्हमध्ये चेन्नईने ऋतुराज गायकवाडला कर्णधार म्हणून सादर केले. चेन्नई सुपर किंग्समध्ये हा बदल अचानक झाला आहे. या निर्णयाची कोणालाच अपेक्षा नव्हती. धोनी नेहमीच आश्चर्यकारक निर्णय घेत आला आहे. पुन्हा एकदा धोनीने अचानक कर्णधारपद सोडत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
दरम्यान एमएस धोनीने यापूर्वी 4 मार्च रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. नवीन सीझन आणि नव्या भूमिकेसाठी आता प्रतीक्षा करू शकत नाही, असे त्याने लिहिले होते. धोनीला काय उघड करायचे आहे, हे त्याच्या पोस्टच्या दोन आठवड्यांनंतर कळले. फ्रँचायझीनेही याला अधिकृत दुजोरा दिला आहे.
सीएसके आणि आरसीबी 22 तारखेला भिडणार
सीएसके 22 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध आयपीएलच्या 17 व्या मोसमात पहिला सामना खेळेल. सध्याचे चॅम्पियन सीएसके आणि आरसीबी यांच्यातील सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे रात्री 8.00 वाजता खेळवला जाईल. धोनीचा हा आयपीएलचा शेवटचा हंगाम असू शकतो.