कॅनबेरा: बॉर्डर-गावसकर करंडकमध्ये पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या चमूत अष्टपैलू ब्यू वेबस्टरचा समावेश केला आहे. जायबंदी मिचेल मार्शला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. वेबस्टर मार्शप्रमाणेच उजव्या हाताने गोलंदाजी करत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.
पर्थ आणि अॅडलेड कसोटीतील विश्रांतीचा काळ लक्षात घेता मार्श तंदुरुस्त होणे अपेक्षित आहे. मात्र, दुखापत आणखी बळावल्यास वेबस्टरचा अंतिम अकरात समावेश होऊ शकतो. शेफील्ड शिल्डच्या यंदाच्या हंगामात ३० वर्षीय वेबस्टरने ५ शतके आणि ९ अर्धशतकांच्या बळावर १७८८ धावांनी सातत्य राखले आहे. वेबस्टरने भारत ‘अ’ विरुद्ध खेळताना चार डावांत ७२.५० च्या सरासरीने १४५ धावा काढल्या होत्या. तसेच सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांत तो ब्रेंडन डोगेडसोबत (प्रत्येकी ७) संयुक्तपणे अग्रस्थानावर होता.