पुणे : भारतीय कुस्तीला एक विशेष नाविन्य प्राप्त करून देणाऱ्यांमध्ये स्व. पैलवान खाशाबा जाधव यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. त्यांचे कुस्ती क्षेत्रात काम प्रशंसनीय आहे. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली असून, भारताला पहिले ऑलिंम्पिकचे मेडल मिळवून देणारे स्व. पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्रमात केली.
स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या मूळगावी त्यांच्या नावाने राज्यस्तरीय क्रीडा संकुल व्हावे, खाशाबांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जावा, त्यांना पद्म पुरस्कार मिळावा तसेच खाशाबांचा जीवनपट पडद्यावर यावा, यासाठी पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे संघटक पै. युवराज काकडे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव, अॅड धनंजय मधवन्ना, पै. संग्राम कांबळे हे गेली १० वर्षांपासून राज्य सरकारकडे मागणी करत होते. आज खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या मागणीला यश आले असून, राज्यातील कुस्ती विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
”आत्तापर्यंत कोणाच्याही नावाने राज्य क्रीडा दिन साजरा केला गेला नाही. मात्र, पहिल्यांदाच स्व. पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे. तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. याचेही चित्रीकरण सुरु असून, लवकरच चित्रपट पडद्यावर येणार आहे”, असे युवराज काकडे यांनी सांगितले.
वडिलांसोबत कुस्ती खेळायला सुरुवात
स्व. पै. खाशाबा जाधव यांनी त्यांच्या वडिलांसोबत कुस्ती खेळायला सुरूवात केली होती. 1952 मध्ये खाशाबा दादासाहेब जाधव यांनी तीनवेळा फ्लायवेट चॅम्पियन निरंजन दासचा पराभव केला होता आणि ऑलम्पिक स्पर्धेतून पहिलं वैयक्तिक कांस्य पदक मिळवले होते. तेव्हा त्यांचे वय होते फक्त 27 वर्षे. इतक्या कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात त्यांनी इतिहास निर्माण केला होता.