ICC Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) बुधवारी कसोटी क्रिकेट खेळाडूंची (पुरूष) ताजी रँकिंग प्रसिद्ध केली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज आणि यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या जसप्रीत बुमराहला यामध्ये मोठा झटका बसला असून दक्षिण आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज कगिसो रबाडानं बुमराहला मागे टाकत रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा हा सध्या चांगल्या फार्मात आहे.
अलीकडेच झालेल्या मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ९ विकेट घेत त्याने ३०० विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. याच जोरावर दक्षिण आफ्रिकेने मीरपूरमधील कसोटीत ९ विकेटनं विजय मिळवला होता.
बुमराहची पीछेहाट..
पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला एकही विकेट घेता आली नाही. त्याचा परिणाम ताज्या क्रमवारीत दिसून आला आहे. दोन स्थानांचे नुकसान होऊन त्याची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड हा दुसऱ्या स्थानी आहे. तर भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनच्या क्रमवारीत घसरण होऊन चौथ्या स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा अव्वल पाच गोलंदाजांमध्ये आहे.
भारतविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मिचेल सँटनरने क्रमवारीत ३० स्थानांची झेप घेतली. पुणे कसोटीत १३ विकेट घेणारा हा फिरकीपटू ४४ व्या स्थानी पोहचला आहे.
विराट कोहली आणि रिषभ पंतला झटका..
फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला एका स्थानाचा फायदा झाला असून तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याने पुण्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे ३० आणि ७७ धावा केल्या होत्या. पण दुसरीकडे स्फोटक फलंदाज रिषभ पंत आणि विराट कोहलीचे क्रमवारीतील स्थान घसरले आहे. तो सध्या ११ व्या स्थानी आहे. तर कोहली १४ व्या स्थानी घसरला आहे.
न्यूझीलंडचा ड्वेन कॉन्व्हे याच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत ८ स्थानांची सुधारणा होऊन तो २८ व्या स्थानी, तर टॉम लॅथम हा ३४ व्या स्थानी पोहोचला आहे. ग्लेन फिलिप्स ४५ व्या, दक्षिण आफ्रिकेचा काइल वेरिन ३२ व्या स्थानी पोहोचला आहे.
जडेजा ऑलराउंडर नंबर १..
जडेजा ऑलराउंडर नंबर १ कसोटीतील अष्टपैलू खेळाडूंच्या ताज्या क्रमवारीत भारताचा रविंद्र जडेजा पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर आर. अश्विन हा दुसऱ्या स्थानी आहे. दोघांनी क्रमवारीत चांगली प्रगती केली आहे. बांगलादेशचा मेहदी हसन तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याचा फायदा त्याला या क्रमवारीत झाला.