नवी दिल्ली: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया इतिहास रचण्यात थोडक्यात मुकली आहे. ऑस्ट्रेलियाने जेतेपदाच्या लढतीत यजमानांचा पराभव करून विजेतेपदापासून वंचित ठेवले. या पराभवाच्या दुःखातून टीम इंडियाच्या खेळाडूंसह क्रिकेट चाहते हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बातम्या येत आहेत की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत बैठक घेऊ इच्छित आहे. पुढील 4 वर्षांसाठी तीनही फॉरमॅटवर नव्याने चर्चा करू इच्छित आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या भविष्याबद्दल स्पष्टता आणि नवीन कर्णधार तयार करण्याबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने आधीच निवडकर्त्यांना सांगितले होते की, जर त्याच्या नावाचा T20 साठी विचार केला गेला नाही तर त्याला काही हरकत नाही. भारतीय निवडकर्त्यांना तरुणांना प्राधान्य द्यायचे आहे. अशा परिस्थितीत रोहित त्याच्या वनडे कारकिर्दीकडे कसा पाहतो? हे पाहणे रंजक ठरेल. पुढील एकदिवसीय विश्वचषक 2027 मध्ये होणार आहे, तेव्हा रोहितचे वय 40 च्या आसपास असेल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी निवडकर्त्यांची नजर युवा खेळाडूंवर आहे. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारतीय संघाला पुढील एका वर्षात 6 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. बीसीसीआयने सूत्रांचा हवाला देत लिहिले की, ‘एकदिवसीय वर्ल्डकपपूर्वी रोहितने सांगितले होते की, टी-20 साठी त्याच्या नावाचा विचार न झाल्यास त्याला काही हरकत नाही. गेल्या एक वर्षापासून निवडकर्ते तरुण खेळाडूंमध्ये गुंतवणूक करत आहेत. पुढील वर्षी होणारा टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेऊन निवडकर्त्यांना आपली रणनीती बदलायची नाही.
निवडकर्त्यांसमोर कर्णधार निवडण्याचे मोठे आव्हान
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड आणि निवडकर्ते आगामी आयपीएल व टी 20 विश्वचषक 2024 नंतरच वनडेसाठी योजना तयार करतील. नवीन कर्णधार तयार करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात टी-20 मालिका खेळल्यानंतर, भारतीय संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाईल. जिथे त्यांना 2 कसोटी आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळावी लागेल.