मुंबई: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये लवकरच बदल दिसू शकतात. सध्या राहुल द्रविड हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत, मात्र बीसीसीआयने नवीन मुख्य प्रशिक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू केल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू स्टीफन फ्लेमिंग यांना भारताचे नवे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. फ्लेमिंग आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या पदासाठी कधी अर्ज करतात याची बीसीसीआयचे अधिकारी वाट पाहत आहेत. बीसीसीआयच्या अटींनुसार नवीन प्रशिक्षकाला तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
बीसीसीआयने प्रक्रिया केली सुरू
बीसीसीआयने भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज मागवणे सुरू केले असून 2024 च्या T20 विश्वचषकानंतर नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाऊ शकते. सूत्रांचे म्हणणे आहे की, 2009 पासून चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे नव्या प्रशिक्षकाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर येत्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटची स्थिती बदलण्याची शक्यता आहे. फ्लेमिंगकडे उत्तम व्यवस्थापन कौशल्य आहे आणि त्याला सकारात्मक वातावरण निर्माण करून खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी मिळवायची हे माहीत आहे. आयपीएलमधील सीएसकेचे प्रशिक्षक म्हणून त्याच्या यशाच्या टक्केवारीमुळे त्याच्याकडे टीम इंडियाचे नवीन प्रशिक्षक म्हणूनही पाहिले जात आहे.