Babar Azam : पुणे : वर्ल्ड कप 2023 भारतात सुरू आहे. त्यातच यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाची खेळी अत्यंत वाईट होती.आताची मोठी बातमी म्हणजे बाबर आझम कर्णधार पद सोडणार आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, बाबर आझमने त्याच्या जवळच्या लोकांशी आणि पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू रमीझ राजा यांच्याशी कर्णधार पदाबद्दल चर्चा केली आहे. बाबर आझम आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घेऊन कर्णधारपद सोडणार की नाही याचा निर्णय घेईल. 2023 चा वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमची कामगिरी ही काही आकर्षक गिसली नाही. त्याने 8 सामन्यात केवळ 282 धावा केल्या आहेत.
बाबर आझमच्या जवळच्या काही लोकांनी त्याला खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्यास सांगितले आहे. पाकिस्तान आज इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये खेळणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला खूप टीकेला सामोरे जावे लागले. पाकिस्तानने आतापर्यंत 8 पैकी केवळ 4 सामने जिंकले असून त्यामुळे ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत.
जर पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी पात्र ठरायचे असेल तर त्यांना आज इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. मात्र इंग्लंड सारखा बलाढ्य संघ पाहिला तर तो मोठा फरकही अशक्य वाटत आहे. मात्र, या सगळ्या दरम्यान पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम वर्ल्ड कपनंतर आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.