नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. तो 44 चेंडूंत 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 106 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा फलंदाजीचा स्ट्राईक रेट 240.91 एवढा होता. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने ही कामगिरी केली. त्याने एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावताना 49 चेंडूत शतक पूर्ण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामचा विक्रम मोडला आहे .
यापूर्वी याच विश्वचषकात एडन मार्करामने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 49 धावांत शतक झळकावले होते. मॅक्सवेलच्या शतकाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने नेदरलँड्सच्या गोलंदाजांवर अजिबात दया दाखवली नाही. तो सहाव्या विकेटसाठी 39.1 षटकांत फलंदाजीला आला आणि त्याने 48.5 व्या षटकांत आपले शतक पूर्ण केले. याआधी मॅक्सवेलने 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 51 चेंडूत शतक झळकावले होते.
एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) – 40 चेंडू विरुद्ध नेदरलँड, 2023* (आज)
एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका) – 49 चेंडू वि. श्रीलंका 2023
केविन ओब्रायन (आयर) – 50 चेंडू वि. इंग्लंड, 2011
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) – 51 चेंडू वि. श्रीलंका 2015
नेदरलँडला 400 धावांचे लक्ष्य
दिल्लीत खेळल्या जाणार्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 विकेट गमावत 399 धावा केल्या. संघासाठी प्रथम सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नरने 93 चेंडूंत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने 44 चेंडूत 240.91 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 106 धावा केल्या.