SA vs AUS: नवी दिल्ली: पाच वेळचा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अहमदाबादमध्ये 19 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कांगारूंनी दक्षिण आफ्रिका संघाचा 3 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने 47.2 षटकात 7 विकेट गमावत 215 धावा केल्या. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेने त्यांना ‘चोकर्स’ का म्हणतात हे पुन्हा सिद्ध केले. आयसीसी टूर्नामेंटच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये विखुरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा अव्वल फलंदाजी क्रम ऑस्ट्रेलियाविरुद्ध पत्त्याप्रमाणे घसरला.
213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडच्या जोडीने अर्धशतकी सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. वॉर्नर 29 धावा करून बाद झाला तर ट्रॅव्हिस हेडने 48 चेंडूत 62 धावांची खेळी केली. स्टीव्ह स्मिथ 30 धावा करून बाद झाला. मिचेल मार्शला खातेही उघडता आले नाही. ग्लेन मॅक्सवेल एक धाव काढून बाद झाला. जोश इंग्लिश 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
या आधी दबावाखाली खेळलेल्या डेव्हिड मिलरच्या 101 धावांच्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवले. क्विंटन डी कॉक (०3), टेम्बा बावुमा (०), रॅसी व्हॅन डर ड्युसेन (०6) आणि एडन मार्कराम (10) हे 12 षटकांत पॅव्हेलियनमध्ये पोहचले.
मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत लवकर विकेट घेतल्या. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे 40 मिनिटांचा ब्रेक झाला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 14 षटकांत 4 गडी गमावून 44 धावा होती. यानंतर मिलरने 116 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि पाच षटकारांसह आपले सहावे वनडे शतक झळकावले. विश्वचषकाच्या बाद फेरीतील दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे हे पहिले शतक होते. टर्निंग पिचवर मिलरला कोणतीही अडचण आली नाही आणि तो अॅडम झम्पाच्या चेंडूंवर वर्चस्व गाजवत असल्याचे दिसत होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने त्याच्या सात षटकांत 55 धावा दिल्या.
मिलरने स्क्वेअर लेगवर पॅट कमिन्सवर 94 मीटरचा षटकार मारून शतक पूर्ण केले. मिलरने हेनरिक क्लासेन (47 धावा) याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी केलेल्या 95 धावांच्या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला थोडा दिलासा मिळाला. पण त्यानंतर ऑफस्पिनर ट्रॅव्हिस हेडने दोन चेंडूंत दोन बळी घेत दक्षिण आफ्रिकेला बॅक फुटवर ढकलले . क्लासेननंतर गेराल्ड कोएत्झीने (19) मिलरला साथ दिली आणि दोघांनी सातव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. पण कमिन्सच्या चेंडूवर कोएत्झी यष्टिरक्षक जोश इंग्लिसकडे झेलबाद झाला. रिप्लेमध्ये चेंडू त्याच्या कोपराला लागल्याचे दिसून आले असले तरी त्याने रिव्ह्यू घेतला नाही. त्यानंतर मिलरही 48व्या षटकात बाद झाला.