दुबई : आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवारी (ता.११) होणार आहे. आशिया चषक जिंकण्यासाठी श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही संघ चषक जिंकण्यासाठी सर्वोत्तापारी प्रयत्न करणार आहेत. तर आज बाजी मारून चषक जिंकून बाजी कोण मारणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
श्रीलंकेच्या संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेने सलग चार सामन्यांत विजय नोंदवले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे श्रीलंकेला रविवारच्या सामन्यात पाकिस्तानवर सरशी साधून जेतेपद पटकावण्याची संधी मिळेल. दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शादाब खान यांसारख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या पाकिस्तानला श्रीलंकेला नमवण्याचा विश्वास आहे.
दरम्यान, सध्याची आशिया चषक स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जात आहे. या स्पर्धेत ज्या संघांनी नाणेफेक जिंकलेली आहे, त्याच संघांचा बहुतांशवेळा विजय झालेला आहे. मागील वर्षीची टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएईमध्येच खेळवली गेली होती. तेव्हादेखील नाणेफेक जिंकलेल्या संघाला चांगला फायदा झाला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर संघाला वातावरण तसेच खेळपट्टी यांचा अभ्यास करून फलंदाजी तसेच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेता येतो.
अंतिम सामना
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान
वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी