पुणे: काल न्यूझीलंड विरुद्ध खेळताना शुभमन गिलने २०८ धावांची खेळी केल्याने त्याचे नाव द्विशतक वीरांच्या यादीत सामाविस्ट झाले असून यापूर्वी अशी कामगिरी भारताकडून मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, कर्णधार रोहित शर्मा, यष्टीरक्षक ईशान किशन यांनी केली होती.
क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सन २०१० साली नाबाद २०० धावा करताना एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते. त्यानंतर २०११ साली भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजच्या विरोधात आक्रमक फलंदाजी करताना २१९ धावांची खेळी उभारली होती.
सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने तब्बल ३ वेळा २०० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला. यात रोहितने २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना २०९, २०१४ साली श्रीलंके विरुद्ध खेळताना २६४ तर पुन्हा २०१७ श्रीलंके विरुद्धच खेळताना नाबाद २०८ धावांची खेळी केली होती.
मागील वर्षी (सन २०२२) भारताचा सध्याचा यष्टीरक्षक ईशान किशनने बांगलादेश दौऱ्यात २१० धावांची दमदार खेळी करताना भारताला मालिकाविजय मिळवून दिला. त्यानंतर २०२३ या नवीन वर्षात शुभमन गिलने आपले नाव या यादीत सामाविस्ट केले. त्याने न्यूझीलंड विरुद्ध खेळताना २०८ धावांची सुरेख खेळी केली.
द्विशतक वीरांच्या यादीत २०१५ साली वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने झिम्बावे विरुद्ध खेळताना २१५ धावा केल्या होत्या. याच वर्षात न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने वेस्ट इंडिजच्या विरोधात खेळताना २३७ धावा तडकावल्या होत्या. या यादीत पाकिस्तानच्या फखर जमानने २०१८ मध्ये झिम्बाबे बरोबरच्या लढतीत २१० धावांची खेळी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.