नवी दिल्ली: विश्वचषक 2023 आता निर्णायक टप्प्यात आला आहे. भारताशिवाय दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. 15 नोव्हेंबरला होणाऱ्या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर त्याने आपल्या धमाकेदार कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. रोहित शर्माच्या संघाने आपले सर्व 9 सामने सहज जिंकले असून अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यांपूर्वी, भारताचे अनिल कुंबळे आणि ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू हेडन या जगातील दोन आघाडीच्या क्रिकेटपटूंनी विश्वचषक इलेव्हनची (World Cup XI) निवड केली आहे, ज्यामध्ये त्यांनी पाच भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे.
या दोन्ही दिग्गजांनी सलामीवीर म्हणून भारताच्या रोहित शर्मासह दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकची निवड केली. ESPNcricinfo शी बोलताना ते म्हणाले की, ‘आमच्या मते डी कॉक हा असाधारण खेळाडू आहे. रोहित शर्माची निवड करण्यामागची कारणे स्पष्ट आहेत. पॉवर प्लेमध्ये हे दोघेही धावसंख्येला गती देण्यासाठी चांगली कामगिरी करतात. विराट कोहली आणि रचिन रवींद्र अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. विराटने या स्पर्धेत आतापर्यंत 594 तर रचिनने 565 धावा केल्या आहेत.
पाचव्या क्रमांकासाठी कुंबळे आणि हेडन यांनी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याची निवड केली आहे, ज्याने स्पर्धेत दोन स्फोटक शतके झळकावली आहेत. नेदरलँड्सविरुद्ध अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावणाऱ्या मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धही द्विशतक (नाबाद 201) झळकावून संघाला विजय मिळवून दिला. सहाव्या क्रमांकासाठी दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन या विश्वचषक इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
अष्टपैलू रवींद्र जडेजा या संघात सातव्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा मार्को जेन्सन, भारताचा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनाही संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. भारताच्या कुलदीप यादवला फिरकी गोलंदाज म्हणून या संघात स्थान मिळवता आलेले नाही. परंतु, सध्या या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा अॅडम झाम्पाला या विश्वचषक इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.
कुंबळे-हेडन विश्वचषक इलेव्हन: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, विराट कोहली, रचिन रवींद्र, ग्लेन मॅक्सवेल, हेनरिक क्लासेन, रवींद्र जडेजा, मार्को जेन्सन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि अॅडम झम्पा.