पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला अखेर कुस्तीत पदक मिळाले. विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर सर्वांच्या नजरा अमन सेहरावतवर होत्या आणि त्याने निराश केले नाही. आपल्या पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्येच, अमनने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. अमनने पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूचा 13-5 असा एकतर्फी पराभव करून कांस्यपदक जिंकले आणि अशा प्रकारे भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहावे पदक मिळाले.
या सामन्याच्या सुरुवातीलाच क्रुझने अमनला मॅटवरून हटवून पॉइंट घेतला होता. अमननेही पलटवार केला आणि लवकरच त्याच्यावर लेग ॲटॅकने दोन गुण मिळवले. पहिल्या हॉफपर्यंत हीच खडतर स्पर्धा सुरू राहिली आणि क्रूझने पुन्हा 3-2 अशी आघाडी घेतली. पण अमनने पुनरागमन करत 2 गुण घेत 4-3 अशी आघाडी घेतली. पहिल्या हॉफमध्ये तीन मिनिटे पुढे राहिल्यानंतर अमनने दुसऱ्या हॉफमध्ये आपली आघाडी 6-3 अशी वाढवली.
ऑलिम्पिक पदार्पणात दमदार कामगिरी
पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या 21वर्षीय अमनसाठी पदार्पण संस्मरणीय ठरले. त्याने शानदार सुरुवात केली आणि पहिल्याच चढाईत मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हचा 10-0 असा पराभव केला. यानंतर, त्याचा हाच पराक्रम उपांत्यपूर्व फेरीतही पाहायला मिळाला. जिथे त्याने अल्बेनियाच्या झेलीमखान अबाकारोव्हचा 12-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, अमनला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. कारण त्याचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या रे हिगुचीशी होता. हिगुचीने 10-0 ने पराभूत करून अंतिम फेरी गाठण्याच्या अमनच्या आशा संपुष्टात आणल्या.
आपल्या गुरूला हरवून अमन ऑलिम्पिकमध्ये पोहोचला
अमनचे हे यश खूप खास आहे, कारण भारताने या प्रकारात सलग 2 ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यापूर्वी रवी दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्येही 57 किलो गटात भाग घेतला होता. तेही रवीचे पहिले ऑलिम्पिक होते आणि त्याने रौप्यपदक जिंकले होते. त्याहून विशेष म्हणजे अमन रवीसोबत दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि त्याला आपला गुरू मानतो. यावेळी त्याने राष्ट्रीय चाचण्यांमध्ये रवी दहियाचा पराभव करून पात्रता फेरीत प्रवेश केला आणि त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.