दीपक खिलारे
इंदापूर : गुवाहाटी ( आसाम ) येथील रॉयल ग्लोबल युनिव्हर्सिटी मध्ये दिनांक १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत इंदापूर ( जिल्हा पुणे ) येथील अक्षय बाळासाहेब मोरे याने स्पर्धेतील ‘उत्कृष्ट पिचर” हा पुरस्कार पटकावला. तसेच अक्षय मोरे याने बेसबॉल स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करून देशातील वेगवान बेसबॉल पिचर होण्याचा बहुमान संपादन केला.
अक्षय मोरे याच्या अष्टपैलू खेळामुळे त्यांच्या विद्यापीठास रौप्यपदक मिळाले आहे.विशेष म्हणजे अक्षय हा ग्रामीण भागातील खेळाडू असून त्यांच्या घरी कोणतीही बेसबॉल खेळण्याची परंपरा नाही. कोणताही पूर्व अनुभव नसताना देखील अक्षयने मिळवलेले यश लक्षवेधी ठरले. अक्षय हा पंजाब राज्यातील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी संचलित कृषी महाविद्यालयात प्रथम वर्गात शिकत आहे.
अक्षय मोरे याने विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत एकूण चार सामन्यात उत्कृष्ट पिचींग केले. लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी चा अंतिम सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाशी झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अक्षय मोरे याने चांगले पीचिंग केले मात्र त्यांच्या संघास २-० असा पराभव पत्करावा लागला. मात्र या सामन्यात त्याने ९१ मैल प्रतीतास वेगाने पिचिंग करून देशातील सर्वात वेगवान बेसबॉल पिचरचा नवा विक्रम नावावर केला आहे.
दरम्यान, या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून खेळताना भिमानगर ( तालुका माढा जिल्हा सोलापूर ) येथील विजय महाडिक याने बेस्ट क्याचर म्हणून पुरस्कार संपादन केला आहे.
या यशामध्ये त्यांना प्रशिक्षक राकेशकुमार, विष्णू कारेल, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे स्वप्नील गलांडे व विक्रम गलांडे यांचे मार्गदर्शन लाभले.अक्षय मोरे हा इंदापूर येथील मोरे कृषी उद्योग समूहाचे संस्थापक कै. तुकाराम मोरे यांचा नातू तर इंदापूर अर्बन सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांचे चिरंजीव आहेत.
या यशाबद्दल अक्षय मोरे यांचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाडूळे, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक वामनराव सरडे, इंदापूर जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी अभिनंदन केले.