मुंबई: कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने आयपीएल २०२५ च्या हंगामापूर्वी फलंदाज अजिंक्य रहाणेला संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे, तर अष्टपैलू वेंकटेश अय्यर संघाचा उपकर्णधार असेल. रहाणेच्या नेतृत्वाखाली केकेआर संघ जेतेपदाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने प्रवेश करेल. गेल्या हंगामात, श्रेयस अय्यरने संघाची सूत्रे हाती घेतली आणि १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संघाला जेतेपदापर्यंत नेले. यावेळी श्रेयस पंजाब किंग्जचे नेतृत्व करेल, त्यामुळे केकेआर नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळेल.
वेंकटेश अय्यरला केकेआरने सर्वाधिक किमतीत खरेदी केले आणि तो आगामी हंगामात रहाणेसोबत एकत्र काम करेल. व्यंकटेश बऱ्याच काळापासून कोलकाता फ्रँचायझीचा भाग आहे. गतविजेता केकेआर आयपीएल २०२५ मध्ये २२ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रहाणे म्हणाला, आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या केकेआरचे नेतृत्व करणे हा सन्मान आहे. मला वाटते की आमचा संघ संतुलित आणि उत्कृष्ट आहे. विजेतेपदाचे रक्षण करण्याचे आव्हान पेलण्यासाठी मी सर्वांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सोबत दोन वर्षे घालवल्यानंतर रहाणे केकेआरमध्ये परतत आहे. त्याने स्वतःला टी-२० खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. रहाणेने २०२२ च्या हंगामात केकेआरसाठी सात सामने खेळला आणि १३३ धावा केल्या. मुंबईच्या या अनुभवी फलंदाजाला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचाही अनुभव आहे. रहाणेने २०१८ आणि २०१९ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले. रहाणे हा मुंबई रणजी संघाचा कर्णधार आहे आणि विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात तो भारतीय संघाचा नियमित उपकर्णधारही होता.